विद्यापीठाची पेट(PET) परीक्षा ३ नोव्हेंबरला होणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) 6 नोव्हेंबरला परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
या परीक्षेद्वारे विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि संलग्न संशोधन केंद्रातील पीएचडी अभ्यासक्रमाच्या एकूण 3 हजार 187 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाने ‘पेट’साठी परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परिपत्रकानुसार 100 गुणांची ही परीक्षा होणार आहे. दोन तासांच्या परीक्षेत रिसर्च मेथडॉलॉजी आणि संबंधित विषय असे दोन पेपर होणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज भरण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1000 रुपये, तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 800 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
एमफिल, नेट, पेट 2021 अशा परीक्षा उत्तीर्ण असणार्या विद्यार्थ्यांना, ही परीक्षा देण्यापासून सवलत दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबतच कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि शुल्क भरून, सहभागी व्हावे लागणार आहे. या परीक्षेबाबत अधिक माहिती विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर मिळणार आहे.
काही अभ्यासक्रमांसाठी नाममात्र जागा:- 3 हजार 187 हजार जागांसाठी पेट होणार असली, तरी काही विषयांसाठी फारच कमी जागा उपलब्ध आहेत.
त्यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तरी त्याला प्रवेश मिळणे अवघड ठरणार आहे. केमिकल अँड बायोटेक्नॉलॉजी, लायब-री अँड इन्फॉर्मेशन सर्व्हिस अशा काही विषयांमध्ये प्रत्येकी एकच जागा आहे, तर कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, म्युझिक, जिऑलॉजी अशा विषयांमध्ये प्रत्येकी चार जागा आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.