Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार जातीचा दाखला; जाणून घ्या सविस्तर माहिती

0

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टाेबरपर्यंत महाराष्ट्रात ‘सेवा पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या काळात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळांमध्येच जात प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉक्टपर प्रशांत नारनवरे यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेतच जात प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. कास्ट सर्टिफिकेटसह ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, ऊसतोड कामगार प्रमाणपत्र नागरिकांना देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तशी माहिती देण्यात आली आहे.

ही कागदपत्रे द्यावी लागणार:- नारनवरे यांच्या माहितीनुसार, आता शाळेतच विद्यार्थ्यांना 7 दिवसांच जात प्रमाणपत्र दिले जाईल. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचे दाखले, रहिवासी दाखले आदी कागदपत्रे शाळेतच द्यावी लागतील. दक्षता पथकांकडून या कागदपत्रांची शाळांमध्येच पडताळणी केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांत जात प्रमाणपत्र देण्यात येईल. विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची अडचण असेल किंवा काही पुरावे नसतील, तर विद्यार्थ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. जात पडताळणी समितीच्या वतीने काही विद्यार्थ्यांना प्रमाणित केलं जाईल. त्यानंतर त्यांची पडताळणी करुन जात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती नारनवरे यांनी दिली.
राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून सगळी कागदपत्रे जमा करुन घेतली जाणार असून, त्यानंतर सात दिवसांत जात प्रमाणपत्र दिले जाईल. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे जातीचा दाखला काढण्यासाठी विद्यार्थी-पालकांची होणारी धावपळ व परवडही थांबेल, असा विश्वास नारनवरे यांनी व्यक्त केला.