अग्निविर योजनेंतर्गत नागपुरात सैन्य भरती 27 सप्टेंबरपासून
येत्या 27 सप्टेंबरपासून नागपुरात सुरू होणार्या अग्निविर योजनेंतर्गत सैन्य भरतीसाठी विदर्भातील एकूण दहा जिल्हयातून 60 हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अग्निविर योजनेतंर्गत तरुणांना देशसेवेची संधी मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
पत्रपरिषदेत बोलताना डॉ. इटनकर म्हणाले, साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांची लष्कराची भरती प्रक्रिया ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार आहे.
या तरुण अग्निविरांमुळे लष्करात उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही भरती रात्री 12 ते सकाळी 12 वाजेपर्यंत होणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर अशा दहा जिल्हयातून येणार्या उमेदवारांना भरती मैदानावर ने-आण करण्यासाठी ( बस स्थानक व रेल्वे स्थानक ते विभागीस क्रीडा संकुन मानकापूर ) महानगर पालीकेच्या सीटी बसेसची सुविधा सेल्फ पेड तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उमेदवारांची स्वत:ची वाहने आणल्यास त्यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था कस्तुरचंद पार्कमध्ये करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र प्राप्त उमेदवारांनी प्रवेशपत्रासह क्रीडा संकूल मानकार येथे हजर रहाणे अपेक्षीत आहे. सैन्य भरती कार्यालयाच्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. उमेदवारांच्या सुरक्षीततेसाठी तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवेसाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहीका, आपतकालिन मेडिसीन कीटउपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विशेष शाखा व वाहतूक नियंत्रण शाखा यांचे कडून व्यवस्था करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकीय विभाग तसेच परीवहन विभागातर्फे सैन्य भरती मेळाव्या दरम्यान आवश्यक असलेल्या सगळया सुविधा वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला कर्नल जगतनारायण, विंग कमांडर रत्नाकर सिंग, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, डॉ. मेजर शिल्पा खरपकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे आदी उपस्थित होते.