Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे! आरोग्य सेवक पदासाठीच्या पात्रतेमध्ये बदल

0

क्र.: सेप्रनि २०१९/बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी प्र.क्र.८०५/सेवा ५ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन आणि याबाबतीत केलेले सर्व विद्यमान नियम, आदेश, निर्णय किंवा संलेख यांचे अधिक्रमण करुन, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील ” बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष), गट-क ” या पदाच्या सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहेत.

या नियमांस, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयामधील “बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष), गट-क (सेवाप्रवेश) नियम २०२१” असे संबोधण्यात यावे. या नियमांमध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रेत नसेल तर,
क) “परिमंडळ” याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रशासकिय प्रयोजनासाठी स्थापन केलेले जिल्हानिहाय गट, असा आहे.
ख) “आयुक्तालय” याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेले आरोग्य सेवा आयुक्तालय, असा आहे;
ग) “विभाग” याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, असा आहे; “शासन” याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे;
घ)“उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा” याचा अर्थ महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा ४१) अन्वये घटित केलेल्या विभागीय मंडळाद्वारे आयोजित केलेली उच्च माध्यमिक शालांन्त प्रमाणपत्र परिक्षा, असा आहे आणि त्यात शासनाने त्याच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेल्या इतर कोणत्याही परिक्षेचा समावेश होतो.
च) “निवड समिती” याचा अर्थ, शासकिय सेवेतील गट-क व गट-ड च्या पदांवरील सरळसेवाभरती करिता
उमेदवरांची निवड करण्याच्या प्रयोजनार्थ, शासनाने वेळोवेळी घटित केलेली असा आहे.

बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी (पुरुष), गट क या पदावरील नियुक्ती एकतर, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोक्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी या पदावरील किमान तीन वर्षे इतकी नियमित सेवा असणाऱ्या आणि पोटनियम (ख) च्या खंड (दोन) व (तीन) मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींमधून, योग्यतेस अधीन राहून, सेवाज्येष्ठतेच्या आधारावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. किंवा (ख) पुढील व्यक्तींमधीन जे,- (एक) अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे नाहीत आणि अडतीस वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत;

परंतु राखील प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत, उच्च वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल; (दोन) विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण केलेली आहेत; आणि (तीन) विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निमवैदयकिय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरिक्षक (सॅनिटरी इन्सपेक्टर) किंवा समकक्ष अभ्यासक्रम पुर्ण करुन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अशा उमेदवारांमधून निवड समितीने आयोजित केलेल्या स्पर्धात्मक परिक्षेच्या निकालाच्या आधारे नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल. नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती ही, पदोन्नतीने व नामनिर्देशनाने अनुक्रमे १०:९० या प्रमाणात करण्यात येईल. नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, मराठी भाषा व हिंदी भाषा परिक्षा, त्याबाबतीत केलेल्या नियमांनुसार, अगोदरच उत्तीर्ण केल्या नसतील अथवा त्या उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर, त्या उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. सदर व्यक्ती, मराठी भाषा व हिंदी भाषा परिक्षा, उत्तीर्ण होईपर्यत अथवा सदर परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात येईपर्यंत वार्षिक वेतनवाढीस अथवा पदोन्नतीस पात्र असणार नाही.

नियम ३ येथे नमूद पदांवर पदोन्नतीने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने, शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र विहित कालावधीत, त्यातून सूट देण्यात आली नसेल तर, धारण करणे आवश्यक राहील. अन्यथा सदर व्यक्ती, शासनाने त्याबाबतीत विहित केलेल्या नियमांनुसार संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत किंवा त्यातून सूट देण्यात येईपर्यंत वार्षिक वेतनवाढीस किंवा पदोन्नतीस पात्र असणार नाही.

नियम ३ येथे नमूद केलेल्या पदांवर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती, महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापन) नियम, २००५ यांच्या तरतूदीनुसार किंवा त्याबाबतीत, शासनाने वेळोवेळी केलेल्या इतर कोणत्याही नियमांनुसार, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करील. नियम ३ येथे नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, परिमंडळ कोठेही बदलीस पात्र असेल. सदर पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने काढण्यात आले.

(डॉ. प्रदीप व्यास) शासनाचे अपर मुख्य सचिव