गोवा पोलीस भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरु करणार
गोवा पोलीस विभाग भरती प्रतीक्षेत असणाऱ्या व तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहेत, गोवा पोलीस विभागत येत्या 8 दिवसात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गोवा पोलीस भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोवा पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आधी विधानसभा आणि त्यानंतर पंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दिलं. गोव्यात सध्या वाढत्या गुन्हेगारीमुळे सरकार आणि गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मात्र कोव्हिड नंतरच्या काळात ही गुन्हेगारी वाढली असून यात राज्याबाहेरील लोकांचा सहभाग असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केला आहे.
तसंच गोव्यात गुन्ह्यांच्या तपासाचा दरही देशात सर्वाधिक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांच्या कामामध्ये आपण गृहमंत्री म्हणून कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे अन्य राजकारण्यांचा हस्तक्षेप असण्याचं कारण नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान हैदराबाद पोलिसांकडून गोवा पोलिसांवर विनाकारण आरोप होत असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी केलेल्या मेलला अजूनही उत्तर न दिल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. गोव्यात अपघाती मृत्यूंचं प्रमाण हे फार मोठं आहे. याला वाहतुकीचे नियम न पाळणं हेच महत्त्वाचं कारण आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच अपघात होऊन त्यात अनेकांना आपला जीव गमावावा लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.