आयटीआय प्रवेशासाठी ११ सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालानुसार नव्याने उत्तीर्ण झालेले आणि आत्तापर्यंत दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या अशा विद्यार्थ्यांना राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना बुधवार (ता. ७) ते रविवार (ता. ११) दरम्यान ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठीचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घोषित केले आहे.

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत ऑगस्ट २०२२ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आणि खासगी आयटीआयमधील प्रवेश फेरीचेही वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे.
त्याचप्रमाणे अद्ययावत प्रवेश वेळापत्रक संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना एसएमएसद्वारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट द्यावे, असे आवाहन संचालनालयाने केले आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाने नव्याने संलग्नता प्रदान केलेल्या तुकड्यांचा समावेश सद्यःस्थितीत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आलेला आहे.
उमेदवारांनी आयटीआयनिहाय रिक्त जागांचा तपशील अभ्यासावा, त्याप्रमाणे संस्थास्तरीय समुपदेशन फेरीत सहभाग घ्यावा, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी नमूद केले आहे.