नोकरीची संधी! पीएमपी लवकरच करणार २ हजार वाहकांची भरती
आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात नवीन ई-बस दाखल होणार आहेत. तसेच काही वाहक निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पीएमपीला वाहकांची कमतरता भासणार आहे. याचाच विचार करता पीएमपी प्रशासनाने 2 हजार बदली हंगामी रोजंदारी पध्दतीने कंडक्टरची (वाहक) भरती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पीएमपी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

ठेकेदारांच्या बसमध्ये चालकांची नियुक्ती ठेकेदार करत असले तरी वाहकांची नियुक्ती मात्र पीएमपी प्रशासन करत असते. पीएमपीत वाहकांची मोठी कमतरता असल्यामुळे नुकतेच पीएमपीने आपल्याकडील 600 चालकांना वाहकांचे प्रशिक्षण दिले असून, त्यांना वाहक म्हणून सेवेत रूजू केले आहे. पण अजून काही वाहकांची कमतरता भासणार असल्याने आगामी काळात 2 हजार चालक वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता पीएमपीने ऑनलाइन निविदा काढल्या आहेत. यामुळे शहरातील 2 हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे.
वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून, नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा काम करून देतो, असे सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.