IAS-IPS ची २३०० हून अधिक रिक्त पदे लवकरच भरणार
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषतः करोनाच्या काळात नागरी सेवा परीक्षेकडे तरुणांचा कल वाढला आहे. असे असूनही, देशातील नोकरशाहीतील सर्वोच्च सेवा आयएएस-आयपीएसची २३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न:- १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएसच्या १,४७२ आणि आयपीएसच्या ८६४ जागा रिक्त आहेत. रिक्त पदे भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) दरवर्षी थेट भरतीच्या आधारावर आयएएस आणि आयपीएस श्रेणीतील रिक्त जागा भरण्यासाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते. याव्यतिरिक्त पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी यूपीएससीद्वारे राज्य सरकारांसह निवड समितीच्या बैठका आयोजित केल्या जातात.

जास्त संख्या म्हणजे प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड:- लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA), मसुरी ही नागरी सेवा भरतीसाठी देशातील प्रमुख प्रशिक्षण संस्था आहे असे सिंह म्हणले. बासवान समितीने यासंदर्भात शिफारस केली होती की, १८० पेक्षा जास्त संख्या LBSNAA च्या बॅच क्षमतेपेक्षा जास्त असेल आणि अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करेल. दरम्यान, नागरी सेवा परीक्षा २०२० पासून, IPS अधिकार्यांच्या प्रशिक्षण बॅचमधील उमेदवारांची संख्या २०० झाली आहे.