आता आधारकार्ड साठी होणारी लूट थांबणार; ‘पोस्टमन’ काढणार लहान मुलांचे आधारकार्ड
आधारकार्ड हे आजकाल सर्वांसाठी महत्वाचे आहे.
त्यामुळे लहान मुलांचेही आधारकार्ड जरूर बनवले पाहिजे. जर तुमच्या मुलांचे आधारकार्ड बनवलेले नसेल तर तुम्हाला अनेक ठिकाणी अडचणी येऊ शकतात. नवीन शाळेसाठी मुलांची प्रवेश प्रक्रिया सुरु होताना, पालकांना त्याबाबतची पळापळ देखील सुरु करावी लागते, कारण त्यासाठी अनेक कागदपत्रांची देखील आवश्यकता पडणार आहे. ज्यामधील एक आधारकार्ड देखील आहे. पाच वर्षाखालील मुलामुलींचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना ही यापूर्वी देण्यात आलेली होती. जून महिन्यापासून पोस्टमनकडे जबाबदारी देण्यात आली असून ग्रामीण भागात लहान मुलांच्या आधार मोहिमेला बळ मिळाले आहे. घरोघरी पोहोचणाऱ्या पोस्टमनच्या माध्यमातून लहान मुलांचे आधारकार्ड तयार करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे नागरिकांना आता आपल्या गावातच मुलांचे आधारकार्ड मिळविण्याची प्रक्रिया करता येणार आहे.
आता पोस्टमन घरोघरी टपाल बटवडा करणारे पोस्टमन आधार काढण्याचे देखील काम करीत आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे आधारकार्ड काढण्याबरोबरच आता पाच वर्षाखालील मुलांचे आधारकार्डही काढले जात आहे. यासाठी त्यांना अंगणवाडी सेविकांची मदत होत आहे. त्यामुळे आधारकार्ड काढण्यासाठी होणारी लूटदेखील थांबणार आहे.

अंगणवाडी सेविकांवर होती जबाबदारी:- गाव खेड्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर यापूर्वी बालकांचे आधारकार्ड काढण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती. परंतु आता पोस्टमनच्या माध्यमातून लहान मुलांचे आधारकार्ड काढले जात आहे. जून महिन्यापासून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पोस्टमन अंगण वाड्यांमधून मोहीम राबवत आहेत.
काय कागदपत्रे लागणार

लहान मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी खालील
कागदपत्रे आवश्यक आहेत.
1. मुलाचे मूळ जन्म प्रमाणपत्र,
2. पालकांपैकी एकाचे आधारकार्ड,
3. दोन्ही कागदपत्रांची मूळ प्रत दाखविणे बंधनकारक
आहे.
लहान मुलांचे आधारकार्ड बनवण्याचे फायदे:
1)आधारकार्ड हे मुलांचे ओळखपत्र म्हणून काम करेल. लहान मुलांचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड बनत नाही. त्यामुळे आधारकार्डच लहान मुलांचे ओळखपत्र असते.
2)शाळेत देखील आता प्रवेशासाठी आधार नंबर मागितला जातो. ज्या मुलांचे आधारकार्ड नसेल त्यांना शाळेतून देखील विशिष्ट कालावधित आधारकार्ड बनवण्यास सांगितले जाते. शिष्यवृत्तीसारख्या अन्य योजनांसाठी देखील आधारकार्डची आवश्यकता असते.
3)लहान मुलांच्या नावे बँकेत बचत खाते
उघडण्यासाठीही आधारकार्ड जरूरी असते.