MPSC परीक्षेबाबत शासनाचा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांचा होणार मोठा फायदा
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात ‘एमपीएससी’तर्फे परीक्षा घेतल्या जातात. या प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत ‘एमपीएससी’मार्फत शासनाला शिफारस केली जाते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 मध्ये परीक्षेसाठी उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कमाल संधीबाबत मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार, खुल्या गटातील (अराखीव) उमेदवारांना कमाल 6 संधी, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 9 संधी, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नसल्याचे जाहीर केले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर ‘एमपीएससी’ने हा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात फेरबदल करण्यात आला असून, उमेदवारांच्या कमाल संधींची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.