Take a fresh look at your lifestyle.

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष ‘अभियांत्रिकी पदविकेच्या’ कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार

0

मुंबई- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेडमधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक डॉ. अभय वाघ, सहसंचालक डॉ. प्रमोद नाईक, विद्यालंकार तंत्रनिकेतनचे प्राचार्य आशिष उकिडवे, उपप्राचार्य वर्षा भोसले, तंत्रशिक्षण संचालनालयाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, दरवर्षी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील पदविका स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते आहे. दि. १ जून २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पदविका प्रवेशाच्या नियामावलीस मान्यता देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इयत्ता १० वी नंतरच्या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. २ जून २०२२ रोजी सुरु करण्यात आली आहे.

पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती योजनांची, प्रवेशासंबंधीची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत.प्रथम वर्ष पदविका (१०वी नंतर)-http://poly22.dte.maharashtra.gov.in प्रथम वर्ष पदविका (१२वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.