Take a fresh look at your lifestyle.

गोट बँकेची संकल्पना राबवून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार

0

मुंबई- नागपूर जिल्ह्यातील ५०० महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेचे संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ शशांक कांबळे यांच्यासह प्रक्षेत्र व्यवस्थापक उपस्थित होते.

मंत्री श्री. केदार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन शासन आल्यानंतर महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये झाले आहे. तसेच महामंडळाची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल ४० कोटी रुपयांची पर्यंत पोहचली आहे. पूर्वी राज्यात १०प्रक्षेत्र होते, ते आता १६ झाले आहेत. मांडग्याळ या मेंढीच्या जातीस केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहे. मांडग्याळ ही मेंढीची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध जात म्हणून ओळखली जात आहे. असे त्यांनी सांगितले.

इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत. लोकरीचे विविध प्रकारचे उत्पादने निर्माण करुन विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.