पालकांसाठी महत्वाची बातमी! आरटीई(RTE) प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ; २०० दिव्यांगाचीही निवड
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियम २००९ नुसार २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची मुदत आता १० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात अजूनही ३५ हजार १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नाही. प्रवेशाची २९ एप्रिल ही शेवटची मुदत होती, मात्र प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १० मेपर्यंत मुदत वाढविल्याचे आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी शुक्रवारी काढले आहे. २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) ३० मार्च पुणे येथे काढण्यात आली. ४एप्रिल रोजी पोर्टलवर निवड व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. ९०६८८ विद्यार्थ्यांची निवड तर ६९८५९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली.

२०० दिव्यांगाचीही निवड
२५ टक्के प्रवेश प्रक्रिया आनलाईन पद्धतीने संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचीही निवड झाली असून सर्व विद्यार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहे. निवड यादीतील ९०६८८ पैकी आता पर्यंत ५५५६५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. निवड यादीतीलच ३५१२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अजूनही झालेले नाही. ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठीच मुदत वाढविण्यात आली आहे.