तब्बल ७ हजार जागांसाठी भरती सुरु होणार
गृह विभागाच्या बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही; वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात पोलीसांच्या घरांसाठी 737 कोटी रुपयांची तर यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटींच्या तरतूदीसह पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी एकूण 1 हजार 29 कोटींची तरतूद करण्यात आली असून पोलीस दलासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते आज महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या 119 व्या सत्राच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार असून शिपाई पदावर भरती झालेला कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होतांना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल अशा पद्धतीने कालबद्ध पदोन्नतीची रचना करण्यात आली असून राज्यातील जुन्या पोलीस स्टेशनच्या इमारतींचे दुरूस्ती व नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात अला आहे. त्यातील 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरूवातही झाली आहे. महिला पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्याची वेळ आठ तासांची करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात राज्यात पोलीसांसाठी 1 लाख घरे निर्माण केली जाणार आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

पोलीस दलासाठीचे महत्वाचे निर्णय
पोलीस दलात 7 हजार 231 पदांची भरती करण्यात येणार
शिपाई पदावरील कर्मचारी 30 वर्षानंतर निवृत्त होताना खात्रीने सब इन्स्पेक्टर होईल.
पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीचा किंवा नवीन बांधकामाचा निर्णय
राज्यात 87 पोलीस स्टेशनच्या बांधकामांना सुरुवात
महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटीचा निर्णय लागू राज्य पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधण्याचा निर्णय
वर्ष 2021-22 अर्थसंकल्पात घरांसाठी 737 कोटी आणि यावर्षीच्या अर्थसंकल्पात 802 कोटी अधिक इतर खर्चांकरता मिळून 1 हजार 29 कोटींची तरतूद
महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षण इमारतीसाठी 7 ते 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार