Take a fresh look at your lifestyle.

८ वी पास विद्यार्थ्यांसाठी ‘शिष्यवृत्ती योजना परीक्षा’ २०२१-२२ साठी अर्ज करण्याचे आवाहन

0

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक ०६ एप्रिल २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करुन शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

१. सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.

२. विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे.

३. शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. १००/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. तनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

योजनेचे उद्दिष्ट:- इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

परीक्षेचे स्वरुप:- केंद्रशासनामार्फत मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), नवी दिल्ली यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु.१०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.

पात्रता:- a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न १,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२०-२१ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थ्यांनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (SC / ST चा

विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी,

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी,

४. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत:- दिनांक ०६/०४/२०२२ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व (अपंगत्व) प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही.