मे महिना संपला, आता १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? ‘लाडक्या बहिणीं’साठी महत्त्वाची अपडेट!
मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी सध्या एकच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे – मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? मे महिना उलटून जून महिना सुरू झाला असून, अद्याप हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे.
नेमकी स्थिती काय आहे?
या योजनेच्या लाभार्थी महिलांना यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकत्रित ३००० रुपये १३ मे पासून त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे, मे महिन्याच्या हप्त्याबाबत आता लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे. ३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतरही, मे महिन्याचा हप्ता केव्हा वितरीत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या योजनेच्या आगामी हप्त्याबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत मे महिन्याच्या हप्त्याबाबत आणि निधी वितरणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच हप्ता जमा करण्याच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महिलांना काय आवाहन?
योजनेशी संबंधित सर्व लाभार्थी महिलांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शासनस्तरावरून येणाऱ्या अधिकृत परिपत्रकाची वाट पाहावी. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबत सरकारकडून लवकरच स्पष्टीकरण येणे अपेक्षित आहे.