ग्राम महसूल अधिकारी पदे भरण्यासाठी शासनाचे आदेश
सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त पदांची माहिती मागवली

मुंबई- महसूल व वन विभागाने ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना मागणीपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महसूल विभागाच्या २ एप्रिल २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने दिलेल्या सूचनांनुसार, संबंधित जिल्ह्यांनी रिक्त पदांची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घ्यावी. तसेच पेसा आणि बिगर पेसा क्षेत्र लागू असलेल्या जिल्ह्यांनी स्वतंत्र मागणीपत्र तयार करावे, तर इतर जिल्ह्यांनी एकत्रित मागणीपत्र सादर करावे.
ही सर्व मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास ८ मे २०२६ पर्यंत अनिवार्यपणे सादर करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे ग्राम महसूल प्रशासनातील रिक्त पदे लवकर भरली जाण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवरील प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.