जनगणना २०२७ संदर्भातील बनावट अर्जांपासून सावध राहण्याचे आवाहन
केवळ अधिकृत माध्यमांद्वारेच माहिती नोंदविण्याचे निर्देश

मुंबई- जनगणना २०२७ च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सध्या एक अनधिकृत आणि बनावट अर्ज मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा अर्ज पूर्णतः फसवा असून नागरिकांनी अशा कोणत्याही लिंक, फॉर्म किंवा प्लॅटफॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती नोंदवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी आपली माहिती केवळ दोन अधिकृत माध्यमांद्वारेच सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
१. स्व-नोंदणी: नागरिक https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःची माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला ‘SE ID’ पुढील टप्प्यात प्रगणकांच्या भेटीदरम्यान पडताळला जाणार आहे.
२. प्रत्यक्ष माहिती संकलन: दि. १६.०५.२०२६ ते १४.०६.२०२६ या कालावधीत अधिकृत प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील.
दरम्यान, सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही अनधिकृत स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या अर्ज, लिंक किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच अशा माध्यमांना वैयक्तिक माहिती देण्यापासून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.