Take a fresh look at your lifestyle.

अनुदानित खत वितरणात मोठा बदल; ‘फार्मर आयडी’वर आधारित नवी प्रणाली लागू

0

राज्यातील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आधारित नवी प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रातील अॅग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, अॅग्रीस्टॅक अंतर्गत ‘फार्मर आयडी’चा वापर करून देशातील पहिला पायलट प्रकल्प महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे खतांचे वितरण अधिक नियोजनबद्ध आणि पारदर्शक होणार असून, शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ थेट आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल. तसेच गैरव्यवहार व बनावट नोंदींना आळा बसून संपूर्ण प्रक्रिया अधिक विश्वासार्ह होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रात अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत सर्वाधिक प्रमाणात ‘फार्मर आयडी’ तयार करण्यात आल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्याचे कौतुक केले. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अल्पावधीत मदत निधी वितरित केल्याबद्दल समाधानही व्यक्त केले.

पुढील काळात विविध कृषी योजनांमध्ये ‘फार्मर आयडी’चा व्यापक वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, महाराष्ट्राचा हा उपक्रम देशातील इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.

या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.