‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा आजपासून शुभारंभ
प्रत्येक गावाला दर्जेदार आरोग्य सुविधा; उत्कृष्ट कामगिरीसाठी कोट्यवधींची बक्षिसे
महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधत प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारतर्फे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे महत्त्वाकांक्षी अभियान १ एप्रिलपासून राज्यभर सुरू होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ उपचारांवर नाही तर आजार प्रतिबंध, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैली यावर विशेष भर दिला जाणार आहे. गावागावात शुद्ध पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, स्वच्छता यांसारख्या मूलभूत बाबींवर लक्ष केंद्रित करून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे.
या अभियानाद्वारे संसर्गजन्य आजारांबरोबरच असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व यंत्रणा सक्रिय सहभाग नोंदवणार असून लोकसहभागातून ही चळवळ उभारण्याचा प्रयत्न आहे.
‘आरोग्यसंपन्न गाव’ किताबाची संधी
गावांच्या आरोग्य कामगिरीचे मूल्यांकन ठराविक निकषांवर केले जाईल. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरवण्यात येईल. विजेत्या गावांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
कोट्यवधींचे आकर्षक पुरस्कार
या अभियानासाठी राज्य सरकारने ८०.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी मोठ्या रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत:
जिल्हा परिषद: ५ कोटी, ३ कोटी, २ कोटी
पंचायत समिती: २ कोटी, १.५ कोटी, १.२५ कोटी
ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय: ७५ लाख
प्राथमिक आरोग्य केंद्र: १० लाख (जिल्हा), ५० लाख (राज्य)
उपआरोग्य केंद्र: ५ लाख (जिल्हा), २५ लाख (राज्य)
गाव स्तर: २५ लाख ते ५ कोटींपर्यंत बक्षिसे
हे अभियान दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत राबवले जाणार असून, प्रत्येक गावाला आपली आरोग्य कामगिरी सुधारण्याची आणि ‘आरोग्यसंपन्न गाव’ बनण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
एकूणच, ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अभियान ग्रामीण महाराष्ट्रात निरोगी, स्वच्छ आणि सक्षम जीवनशैलीची नवी चळवळ निर्माण करणार असल्याचे चित्र आहे.