वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक आता ‘जनगणना २०२७’ चे ब्रँड ॲम्बेसेडर!
भारताच्या सोळाव्या जनगणनेचा बिगुल वाजला असून, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांची ‘जनगणना २०२७’ चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या कलेतून सामाजिक जागृती करणाऱ्या पटनायक यांच्या खांद्यावर आता देशाच्या महागणनेच्या प्रचाराची धुरा असेल.
डिजिटल क्रांती: देशातील पहिली ‘कागदमुक्त’ जनगणना
२०२७ ची जनगणना ही भारताच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. विशेष म्हणजे, ही देशातील पहिली डिजिटल जनगणना असेल. स्वातंत्र्यानंतरची ही ८ वी आणि एकूण १६ वी जनगणना आहे. या प्रक्रियेचे नेतृत्व भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त श्री मृत्युंजय कुमार नारायण (IAS) करत आहेत.
‘प्रगती’ आणि ‘विकास’ देणार साथ:- या मोहिमेला अधिक लोकाभिमुख करण्यासाठी ‘प्रगती’ (स्त्री) आणि ‘विकास’ (पुरुष) हे दोन अधिकृत शुभंकर (Mascots) जाहीर करण्यात आले आहेत. हे शुभंकर आधुनिक आणि प्रगत भारताचे प्रतीक म्हणून घराघरांत पोहोचणार आहेत.
कोण आहेत सुदर्शन पटनायक?
* पद्मश्री सन्मान: कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१४ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरवले आहे.
* विश्वविक्रमी कलाकार: २०१७ मध्ये पुरी (ओडिशा) च्या समुद्रकिनाऱ्यावर ४८ फूट ८ इंच उंचीचा जगातील सर्वात मोठा वाळूचा किल्ला बांधून त्यांनी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव कोरले आहे.
जनगणनेचा रंजक इतिहास:- भारतातील जनगणनेचा प्रवास १८३० मध्ये हेन्री वॉल्टर यांनी ढाका येथून सुरू केला. त्यापूर्वी जेम्स प्रिन्सेप यांनी अलाहाबाद आणि बनारसमध्ये मर्यादित स्वरूपात जनगणना केली होती. आता २०२७ मध्ये हेच काम आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने सुदर्शन पटनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास जाणार आहे.