कंत्राटी कामगारांनाही संधी :एसटीत १७ हजारांहून अधिक पदांची भरती प्रस्तावित
राज्यातील प्रवाशांना अधिक सक्षम आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १७ हजार ७४२ चालक व वाहक पदांची भरती प्रस्तावित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्य परिवहन महामंडळातील रिक्त पदांबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य अनिल परब आणि प्रवीण दरेकर यांनीही सहभाग घेतला.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेसची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असून दरवर्षी सुमारे ५ हजार नवीन बस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन बसेससोबतच महामंडळातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून १७,७४२ चालक व वाहक पदांच्या भरतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
या भरती प्रक्रियेत पूर्वी महामंडळात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच प्रवाशांसाठी विविध सवलतीच्या योजना सुरू ठेवणे ही काळाची गरज असल्याचे सांगताना मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आता नियमितपणे वेळेवर दिला जात असून दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे, अशी माहितीही दिली.
