स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधार; बार्टीची आर्थिक सहाय्य योजना सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. यूपीएससी भारतीय अभियांत्रिकी सेवा (Engineering Services) मुख्य परीक्षा २०२६ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना बार्टीमार्फत एकरकमी ५० हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जाती प्रवर्गातील जे उमेदवार UPSC Engineering Services (Main) Examination 2026 साठी पात्र ठरले आहेत, त्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत असल्याचे बार्टीकडून सांगण्यात आले आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी बार्टीच्या संकेतस्थळावरून अर्जाची प्रिंट काढून तो पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमिसाईल प्रमाणपत्र, DAF-1, बँक खात्याचा तपशील (पासबुकची प्रत) तसेच UPSC Engineering Services 2026 च्या पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जोडणे बंधनकारक आहे. सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रती स्कॅन करून bartiupscforestengg@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ अशी ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावरील Notice Board विभागात दिलेल्या सूचनांचा संदर्भ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.
