मीडिया आणि फिल्म क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; अर्ज १५ मार्चपर्यंत स्वीकारले जाणार
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाच्या संलग्नतेने १ एप्रिल २०२६ पासून दृकश्राव्य माध्यमांचे अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांतर्गत स्क्रीनरायटिंग, फिल्म डायरेक्शन, बेसिक सिनेमॅटोग्राफी, फिल्म एडिटिंग, साऊंड रेकॉर्डिंग, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, लाईव्ह साऊंड रेकॉर्डिंग, असिस्टंट कोरिओग्राफर, फिल्म प्रॉडक्शन असिस्टंट, इव्हेंट प्रॉडक्शन अँड मॅनेजमेंट तसेच फिल्म प्रॉडक्शन अँड मार्केटिंग अशा एकूण ११ व्यवसायाभिमुख प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे सर्व अभ्यासक्रम सैद्धांतिक, प्रात्यक्षिक आणि कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारित असून प्रत्येक अभ्यासक्रमाची मुदत ३ महिने असेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत उपकरणांवर प्रशिक्षण देत प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याची संधी मिळणार आहे.
माध्यम तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत गूगल फॉर्मद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच या अभ्यासक्रमांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी व्याख्यात्यांची नियुक्ती करण्यात येणार असून संबंधित क्षेत्रातील अध्यापनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडूनही अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गूगल फॉर्मद्वारे १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक ९८१९८२४९५४ वर संपर्क साधता येईल.
या अभ्यासक्रमांसाठी १८ हजार ते ५२ हजार ५०० रुपये इतक्या माफक शुल्कात आधुनिक माध्यम शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी सहकारी बँकांमार्फत शैक्षणिक कर्जाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश सहकार आयुक्तांनी बँकांना दिले आहेत.

या उपक्रमाबाबत बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत प्रथमच अशा प्रकारचा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. टेलिव्हिजन, वेब, चित्रपट आणि अन्य दृकश्राव्य माध्यमांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.