आरोग्य क्रांतीकडे मोठे पाऊल: नागरिकांचे ‘आभा’ अकाउंट तयार होणार
राज्यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्यविषयक माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ‘आभा (ABHA) अकाउंट’ तयार करण्याचे अभियान राज्यभर सुरू करण्यात आले आहे. या अकाउंटमुळे नागरिकांनी पूर्वी केलेल्या तपासण्या, उपचार, औषधे तसेच लसीकरणाची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात एका ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत डॉ. सुनील कुमार बरनवाल (सीईओ, एनएचए), डॉ. पंकज कुमार अरोरा (डायरेक्टर, एबीडीएम), राज्याचे आरोग्य सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासन विविध आरोग्य योजना प्रभावीपणे राबवत असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल हेल्थ क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास केंद्रीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र आरोग्य विभागही “डिजिटल आरोग्य क्रांती” साकारण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे.
याबाबत बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आयुष्मान भारत डिजिटल मिशन प्रभावीपणे राबविले जात असून नागरिकांना आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

आभा अकाउंटमुळे नागरिकांना कोणत्याही रुग्णालयात उपचार घेताना पूर्वीच्या तपासण्या व वैद्यकीय नोंदी सहज उपलब्ध होणार असल्याने उपचार प्रक्रिया अधिक जलद व अचूक होणार आहे.