विद्यार्थिनींच्या शिक्षणाला बळ: सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून मिळणार आर्थिक मदत
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ ही अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी शिक्षणात मोठा आधार ठरत आहे. या योजनेमुळे इयत्ता ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत मिळून त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होत आहे.

या योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थिनींना दरमहा ६० रुपये (१० महिन्यांसाठी ६०० रुपये) तर इयत्ता ८ वी ते १० वी मधील विद्यार्थिनींना दरमहा १०० रुपये (१० महिन्यांसाठी १,००० रुपये) इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते.
या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थिनींना शिक्षणातील अडथळे दूर करून विना अडथळा शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळांनी विद्यार्थिनींचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक असून अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध आहे.
https://prematric.mahait.org/Login/Login
शासनाच्या या उपक्रमामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींच्या शिक्षणाला नवे बळ मिळत असून सामाजिक न्याय व शैक्षणिक समता साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.
