Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी पाऊल: शासनाची टास्क फोर्सची निर्मिती

0

राज्यातील बळीराजांना नैराश्य आणि आर्थिक दडपणातून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांना थोपवण्यासाठी सरकारने स्वतंत्र राज्यस्तरीय टास्क फोर्स (विशेष कृती दल) स्थापन केले आहे. महाराष्ट्र हा देशातील पहिला राज्य ठरला आहे, ज्याने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहण्याची समर्पित यंत्रणा उभारली आहे.

दररोज सरासरी ७ ते ८ शेतकऱ्यांचे जीवन संपत असल्याचे भयावह वास्तव लक्षात घेऊन ही कृती दल उभारली गेली आहे. या दलाचे मुख्य उद्दिष्ट केवळ आर्थिक मदत देणे नाही, तर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक (कृषी) स्तरांवर एकात्मिक उपाययोजना राबवणे आहे.

या टास्क फोर्सचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करत असून, आंतरराष्ट्रीय कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांचा विशेष सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम अभ्यासणे आणि शाश्वत उपाययोजना सुचवणे ही ही दलाची मुख्य जबाबदारी असेल.

शेतकऱ्यांना तातडीने मानसिक सहाय्य मिळावे यासाठी हेल्पलाइन आणि समुपदेशन केंद्रांचे जाळे अधिक मजबूत केले जाणार आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या टास्क फोर्समुळे शेतकऱ्यांना आत्महत्यांपूर्वी प्रतिबंधात्मक उपाय मिळतील आणि त्यांना शाश्वत उपजीविका तसेच सन्मानाचे जीवन मिळण्यास मदत होईल.