शासनाचा निर्णय: आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील सुमारे दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी आज कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले की, आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानव निर्मित, त्यावेळी मानवी जीवांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य ठरते. त्यामुळे युवकांचा सहभाग वाढवून जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम केली जाईल.
अकॅडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांनी स्पष्ट केले की, राज्यातील 419 शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना विना शुल्क प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात आपत्तीच्या उपाययोजना, बचाव कार्य, आणि वास्तविक परिस्थितीत निर्णय घेण्याचे कौशल्य शिकवले जाणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यांनी सांगितले की, मानव प्रगती करत असली तरी, आपत्तींचे स्वरूप बदलत आहे, त्यामुळे नवीन पिढीला याबाबतची तयारी करणे आवश्यक आहे. शहरी व ग्रामीण भागातील विविध आपत्तींचा अभ्यास करून हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला गेला आहे, असे अकादमीचे प्रतिनिधी हरीश महाजन यांनी स्पष्ट केले.

मंत्री लोढा यांनी नमूद केले की, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कौशल्य विकसित होईल आणि ते स्थानिक स्तरावर देशसेवेत योगदान देऊ शकतील.