Take a fresh look at your lifestyle.

वाहनधारकांसाठी गंभीर इशारा: बनावट वेबसाइट्स आणि फसवणूक मोबाइल ॲप्सपासून सतर्क राहा!

0

राज्यातील वाहनधारक आणि चालकांना आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकसारख्या माध्यमांद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

सध्या फसवणूक करणारे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे ‘आपल्या वाहनाचे चलन बाकी आहे, त्वरित दंड भरा’ किंवा ‘परवाना संस्पेंड होणार आहे, तपासणी करा’ अशा अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. विभागाने स्पष्ट केले की, कधीही सरकारी कर्मचारी किंवा कार्यालय व्हॉट्सअॅपवरून पेमेंट लिंक पाठवत नाहीत.

विशेषतः ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशा अज्ञात फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती व इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी नागरिकांना सल्ला दिला की, फक्त अधिकृत सरकारी संकेतस्थळांचा वापर करावा:

वाहन नोंदणी (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in

ड्रायव्हिंग लायसन्स (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in

परिवहन सेवा – https://www.parivahan.gov.in

ई-चलन पोर्टल – https://echallan.parivahan.gov.in

त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर माहिती न भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक मिळाल्यास नॅशनल सायबर क्राईम पोर्टल (https://www.cybercrime.gov.in) किंवा जवळच्या सायबर पोलिस स्टेशन येथे तात्काळ तक्रार नोंदवावी, असेही कामत यांनी सांगितले.