शेतातून बाजारपेठेपर्यंतचा प्रवास सुलभ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ व सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ लवकरच हटविण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, त्यामुळे राज्यातील प्रलंबित कामांना गती मिळणार असल्याची माहिती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
राज्यात एका गावात दहापेक्षा अधिक पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्यास मर्यादा असल्यामुळे अनेक ठिकाणी विकासकामे रखडली होती. ही अडचण दूर करण्यासाठी मंत्री गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी केंद्रीय मंत्री चौहान यांनी मर्यादा हटविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरच निर्णय लागू करण्याचे आश्वासन दिले.
या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद व सुरक्षितरित्या पोहोचविणे शक्य होईल, वाहतूक खर्चात बचत होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय टप्पा ठरेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा निर्णय शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.