Take a fresh look at your lifestyle.

गावागावात आरोग्य क्रांती: कोटींच्या पुरस्कारांसह राज्यभर नवे अभियान लागू

0

राज्यात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत अभियान राबविले जाणार असून गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आरोग्य संपन्न ग्राम’ मानांकन व कोटींचे पुरस्कार दिले जाणार आहेत.

राज्यातील आरोग्य सेवांमध्ये गुणात्मक सुधारणा करणे, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य उंचावणे आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, जीवनशैलीत बदल, वेळेवर उपचार व पुनर्वसन हे अभियानाचे चार प्रमुख स्तंभ असतील.

अभियानाच्या अंमलबजावणीत आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा सक्रिय सहभाग राहील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य अधिकारी, आशा सेविका व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन लोककेंद्रीत नियोजन व शाश्वत आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जाणार आहे.

गावस्तरापासून राज्यस्तरापर्यंत मूल्यांकन करून पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींसाठी जिल्हास्तरावर २५ लाख, विभागीय स्तरावर १ कोटी आणि राज्यस्तरावर ५ कोटींपर्यंतचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठीही स्वतंत्र पुरस्कार योजना आहे. या अभियानासाठी दरवर्षी ८० कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.