Take a fresh look at your lifestyle.

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता

0

गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा यासाठी ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी दिली.

रश्मी आंबेडकर यांनी सांगितले की, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी स्पर्धा संपल्यानंतर सात दिवसांच्या आत अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका संचालनालयाकडे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे. ही माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

निर्धारित कालावधीत माहिती अपलोड न केल्यास संबंधित क्रीडा संघटनांचा डिफॉल्टर यादीत समावेश करण्यात येणार आहे. तसेच खेळाडूंनी आपले ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक आहे. दोन्ही बाजूंनी सादर केलेल्या माहितीची ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे खेळाडूंना पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभपणे मिळणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. संबंधित खेळाडू व क्रीडा संघटनांनी या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.