Take a fresh look at your lifestyle.

प्रधानमंत्री सुर्यघर मुफ़्त बिजली योजनेअंतर्गत नागरिकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

0

भारत सरकारतर्फे सुरू करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री सूर्यघर मुफ़्त बिजली योजना’ ही नागरिकांना स्वच्छ, अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याचा एक ऐतिहासिक उपक्रम आहे. या योजनेद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येणार असून, आपले घरच वीजउत्पादन केंद्र बनविण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.

योजनेचे उद्दिष्ट

• देशभरातील १ कोटी घरांवर सौर रूफटॉप प्रणाली (Rooftop Solar System) बसविणे

• २५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे १,००० अब्ज युनिट अक्षय वीज उत्पादन

• यामुळे सुमारे ७२० दशलक्ष टन कार्बन उत्सर्जनात घट अपेक्षित

• भारताच्या राष्ट्रीय हवामान उद्दिष्टांच्या (NDCs) पूर्ततेस हातभार

• स्थानिक अर्थव्यवस्थेला, रोजगारनिर्मितीला आणि ऊर्जासुरक्षेला चालना

मुख्य वैशिष्ट्ये

• दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज

• एक कोटी घरांचे उद्दिष्ट, एकूण अंदाजे गुंतवणूक ₹७५,००० कोटी

• अनुदान आणि बँक कर्ज सवलती – ७% व्याजदर, कोणतेही प्रोसेसिंग शुल्क किंवा प्री-पेमेंट चार्ज नाही

• १००% ऑनलाईन प्रक्रिया – नोंदणी, मंजुरी व अनुदान वितरण सर्व https://pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर

अनुदान संरचना

• पहिल्या २ किलोवॅटपर्यंत ₹३०,००० प्रति किलोवॅट

• अतिरिक्त ३ किलोवॅटपर्यंत ₹१८,००० प्रति किलोवॅट

• एकूण अनुदानाची मर्यादा ₹७८,००० पर्यंत

• गटगृहसंस्था (RWA/सोसायटी) साठी EV चार्जिंग किंवा सामायिक सुविधांसाठी ₹१८,००० प्रति किलोवॅट

जळगाव जिल्ह्यातील प्रगती

१२ नोव्हेंबर २०२५ पर्यंत महावितरण जळगाव मंडळ अंतर्गत –

• एकूण ३६,५०२ घरांमध्ये सौर पॅनल्सची बसवणी पूर्ण ☀

• एकूण सौर क्षमता २,१०,९९४ किलोवॅट

• नागरिकांनी सौरऊर्जेद्वारे वीजबचतीत आणि पर्यावरण संवर्धनात पुढाकार घेतला आहे.

“मॉडेल सौर ग्राम” स्पर्धा

प्रधानमंत्री सूर्यघर व प्रधानमंत्री कुसुम (सौर पंप) योजनांच्या १००% अंमलबजावणीसाठी “मॉडेल सौर ग्राम स्पर्धा” सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात निवडलेली गावे

(1) असोदा (ता. जळगाव), (2) फुलगाव व (3) साकेगाव (ता. भुसावळ), (4) जारगाव (ता. पाचोरा),

(5) सांगवी (ता. यावल), (6) पाळधी (ता. धरणगाव)

स्पर्धा कालावधी – १३ ऑगस्ट २०२५ ते फेब्रुवारी २०२६

स्पर्धेत सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा वापरणारे गाव “मॉडेल सौर ग्राम” म्हणून राज्य शासनाकडून प्रमाणित केले जाईल.

नागरिकांनी काय करावे?

• आपल्या घरावर सौर पॅनल बसवण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in/ येथे नोंदणी करावी.

• आपल्या वीज वितरण कंपनीकडून (महावितरण) आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे.

• ही योजना पूर्णतः केंद्रीय शासनाची असून कोणतेही एजंट किंवा खासगी कंपनीकडे पैसे देऊ नयेत.

सौरऊर्जेच्या माध्यमातून “हरित, स्वच्छ आणि आत्मनिर्भर भारत” घडविण्याच्या दिशेने जळगाव जिल्हा सातत्याने वाटचाल करीत आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या योजनेत सहभागी होऊन ऊर्जासाक्षर आणि पर्यावरणपूरक जळगाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.