शेतकऱ्यांनो, किसान क्रेडिट कार्ड महत्त्वाचे नियम वाचा!
शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या किसान क्रेडिट कार्ड KCC योजनेत कर्ज न फेडल्यास कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या योजनेचा उद्देश शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारे पैसे कमी व्याजदरात उपलब्ध करून देणे आहे.
साधारणपणे ₹50,000 ते ₹3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते आणि वेळेवर परतफेड केल्यास प्रभावी व्याजदर फक्त 4% ते 5% असतो. कर्ज फेडले नाही तर बँक काय करते? जर शेतकरी कर्ज फेडू शकला नाही, तर बँक लगेच कठोर कारवाई करत नाही. सुरुवातीला बँक शेतकऱ्याला स्मरणपत्र आणि नोटीस पाठवते.
यानंतरही कर्ज न भरल्यास 90 दिवसांनंतर बँक ते खाते NPA म्हणून घोषित करते. एनपीए घोषित झाल्यावरही बँक प्रथम वाटाघाटी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करते. बँकेचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यास, बँक कायदेशीर प्रक्रिया सुरू करते. किसान क्रेडिट कार्डचे कर्ज हे बहुतांश वेळा जमिनीच्या गहाणावर दिलेले असल्याने, बँक ती जमीन जप्त करू शकते.

जप्तीनंतरही शेवटची नोटीस दिली जाते. त्यानंतरही कर्जफेड न झाल्यास, बँक ती जमीन लिलावासाठी ठेवते. लिलावातून मिळालेल्या रकमेतून कर्ज वसूल केले जाते आणि कर्जापेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास ती शेतकऱ्याला परत दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणे महत्त्वाचे आहे.