Take a fresh look at your lifestyle.

लाडक्या बहिणींनी KYC न केल्यास काय होणार; सविस्तर वाचा!

0

महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता थेट पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा 410 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्यानंतर शुक्रवारपासून हा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

राज्य सरकारकडून महिलांना मिळालेली ही दिवाळी भेटच आहे. या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना दोन महिन्यांत E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. आतापर्यंत 1 कोटी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांनी अजूनपर्यंत केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे.

आता दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील हप्ते नियमित मिळवण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी केवायसी करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे कारण गूगलवर या योजनेच्या केवायसीसाठीच्या अनेक फेक वेबसाइट्स समोर आल्या आहेत.

या वेबसाइट्सवर आपली माहिती भरल्यास डेटा चोरीला जाण्याचा धोका आहे. त्यामुळे केवायसी फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc यावरच पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या मोठ्या संख्येने महिला केवायसी करत असल्यामुळे लाडकी बहीण योजनेची वेबसाइट ठप्प झाल्याचे दिसत आहे.

अनेक लाभार्थ्यांना केवायसी करताना Error येत आहे किंवा OTP मिळत नाहीये ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. तसेच केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार नंबर बंधनकारक करण्यात आला आहे, पण ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्या लाभार्थ्यांसमोर आधार नंबर कुणाचा टाकायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने या तांत्रिक आणि नियमांमधील अडचणींवर तातडीने काय तोडगा काढतो याकडे आता सर्व लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.