आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्तांना शासनाचे विशेष पॅकेज-शासन निर्णय जारी
राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २५१ पूर्णतः व ३१ अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबर २०२५ मध्ये जवळ जवळ ३९ लाख हेक्टर अशा सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त व शासन निर्णय : https://mahasamvad.in/181771/