Take a fresh look at your lifestyle.

आपले कामाचे तास वाढले, जाणून घ्या राज्य सरकारचा नेमके नियम काय?

0

राज्य मंत्रिमंडळाने अलीकडेच कारखाने अधिनियम 1948 आणि महाराष्ट्र दुकाने तसेच आस्थापना अधिनियमात मोठे बदल करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कारखान्यांमधील कामगारांच्या कामाचे तास 9 वरून 12 तास आणि दुकाने व आस्थापनांमधील कामाचे तास 9 वरून 10 तास करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या बदलांमुळे राज्यातील उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढेल आणि रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे. कामाचे तास वाढवले असले तरी आठवड्याचे एकूण कामकाजाचे तास 48 तासच राहणार आहेत ही बाब महत्त्वाची आहे. या नव्या नियमानुसार 8 तासांपेक्षा जास्त केलेल्या कामाला ओव्हरटाईम मानले जाईल आणि त्यासाठी कामगारांना जास्त मोबदला मिळेल.

तसेच तीन महिन्यांत ओव्हरटाईम करण्याची कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय कामादरम्यानच्या विश्रांतीच्या वेळेतही बदल करण्यात आला असून आता 5 तासांनंतर 30 मिनिटे आणि 6 तासांनंतर पुन्हा 30 मिनिटे विश्रांती दिली जाईल. कारखान्यांना उत्पादन वाढवायचे असल्यास किंवा जास्त ऑर्डर असल्यास ते आता सरकारी विभागांची परवानगी आणि कामगारांची लेखी संमती घेऊन कामाचे तास वाढवू शकतील.

यामुळे कामगारांना अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळेल. जर कामगारांनी आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम केले तर त्यांना त्या प्रमाणात बदली सुट्ट्याही दिल्या जातील. हे सर्व बदल 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतील. एकंदरीत कामगारांच्या हिताचे रक्षण करत उद्योगात लवचिकता आणण्याचा हा प्रयत्न आहे.