‘या’ कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार? शासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…
राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या नियमानुसार असलेले कामाचे 9 तास वाढवून ते 10 करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापने (रोजगार नियमन व सेवा अटी) अधिनियम, 2017 या कायद्यात बदल करण्याची तयारी सुरू आहे.
कामगार विभागाने हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला होता. यानुसार दिवसाला कामाचे तास 9 वरून 10 होतील. तसेच सलग पाच तासांनंतर मिळणारी विश्रांती आता सहा तासांच्या कामानंतर मिळेल. याशिवाय तीन महिन्यांतील ओव्हरटाईमची मर्यादा 125 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.
या प्रस्तावित बदलांमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सध्या ओव्हरटाईमसह कामाची कमाल मर्यादा 10.5 तास आहे ती 12 तास करण्याचा विचार आहे. विशेष म्हणजे जर काही तातडीचे काम असेल तर दिवसाला 12 तासांची ही मर्यादाही काढली जाण्याची शक्यता आहे म्हणजे कामासाठी कोणतीही कमाल मर्यादा राहणार नाही.
सध्या हा कायदा 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू आहे. नव्या प्रस्तावानुसार तो 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना लागू होईल. मंत्रिमंडळाने या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यांनी काही तरतुदींवर अधिक स्पष्टीकरण मागितले आहे त्यामुळे हा निर्णय सध्या तरी थांबलेला आहे.