मराठी पत्रव्यवहारांबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय…
राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरु आहे. अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे.
संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.
याबाबत बोलताना डॉ. दिनेश शर्मा म्हणाले की, राजभाषा समिती देशातील प्रादेशिक भाषांना चालना देणे, हिंदी भाषेला सहयोगी भाषा म्हणून प्रस्थापित करणे यासाठी काम करत आहे.
सध्या गृह मंत्रालयातील संपूर्ण कामकाज हिंदी भाषेत होत आहे, मात्र यापुढे मराठी भाषेतील पत्रांना मराठी भाषेतूनच उत्तर देण्यात येईल. तसेच तामिळ भाषेतील पत्रांना तामिळ मधूनच उत्तर दिले जाईल.’
दरम्यान, या बैठकीला, राजभाषा समितीचे सदस्य खा. रामचंद्र जांगडा, खा. राजेश वर्मा, खा. कृतिदेवी देवबर्मन, खा. किशोरीलाल शर्मा, खा. सतपाल ब्रह्मचारी, खा, डॉ अजित गोपछडे, खा. विश्वेश्वर हेगडे (कर्नाटक) आणि इतर अधिकारी उपस्थित होते.