अहमदाबाद विमान अपघातात सापडलेल्या 70 तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क ? कायदा काय सांगतो
अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघालेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. या विमानाच्या अवशेषांची तपासणी करत असताना अनेक मौल्यवान वस्तू हाती लागल्या. सध्या या सर्व वस्तू सरकारी संरक्षणाखाली ठेवण्यात आल्या आहेत. अशा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सरकारची असल्याने, त्या सरकारी तिजोरीत किंवा लॉकरमध्ये जमा करण्यात आल्या आहेत.
भारतात विमान अपघातानंतर ढिगाऱ्यातून सापडलेल्या वस्तूंच्या मालकीबाबत स्पष्ट कायदेशीर नियम आहेत, ज्यांचे पालन नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि स्थानिक प्रशासन करते. अपघातानंतर सापडलेल्या कोणत्याही मौल्यवान वस्तू, मग त्या रोख रक्कम असोत, दागिने असोत किंवा इतर वस्तू, पोलीस किंवा जिल्हा प्रशासन लगेच ताब्यात घेते. कोणत्याही चुकीच्या हाती या वस्तू जात नाहीत.
यानंतर वस्तूंचा खरा मालक कोण आहे, हे शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. यासाठी कागदोपत्री पडताळणी केली जाते. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याने, त्या पूर्ण झाल्यानंतर कागदपत्रांच्या आधारे सोने आणि रोख रकमेचा खरा मालक निश्चित केला जाईल. जर एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला या वस्तूंवर दावा करायचा असेल, तर त्यांना मृत व्यक्तीशी असलेल्या त्यांच्या नातेसंबंधाचा पुरावा, प्रवासाची कागदपत्रे किंवा इतर कायदेशीर पुरावे सादर करावे लागतील.
जर या मौल्यवान वस्तूंसाठी कोणताही खरा दावेदार सापडला नाही, तर त्या सरकारी मालमत्ता म्हणून जप्त केल्या जाऊ शकतात. तसेच हे एक आंतरराष्ट्रीय उड्डाण असल्याने, मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन 1999 चे नियम देखील लागू होऊ शकतात. या नियमांनुसार, ओळख पूर्ण झाल्यानंतरच सोने आणि रोख रकमेचा खरा मालक कोण आहे, हे ठरवले जाईल.