शासकीय सोयी/सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारणे बाबत
१) ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याकरिता या शासन निर्णयासोबतच्या सहपत्रात नमूद बाबींशिवाय अन्य बाबींसाठी तसेच जेथे अधिनियमान्वये बंधनकारक आहे अशा प्रकरणांशिवाय अन्य सर्व प्रकरणी जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि या विभागाच्या अधिनस्त असलेली अन्य संबंधित कार्यालये यांनी यापुढे नागरीक/संस्थांकडून शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र स्वीकारावे. शपथपत्र सादर करणे आवश्यक असलेल्या बाबी आणि शपथपत्र सादर करण्याची आवश्यकता नसलेल्या बाबींची ढोबळ यादी प्रपत्र-अ मध्ये नमूद करण्यात आली आहे. स्वघोषणापत्राचा नमूना प्रपत्र-ब प्रमाणे राहील.
२) ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याकरिता सादर करावयाच्या अर्जासोबत राजपत्रित अधिकारी / विशेष कार्य अधिकारी/सक्षम अधिकारी यांनी स्वयंसाक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रे अथवा कागदपत्रांच्या प्रती सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्राम पंचायती व या विभागाच्या अधिनस्त असलेली अन्य कार्यालये यांनी यापुढे स्वीकाराव्यात.
स्वयंसाक्षांकित प्रतींसह त्यांच्या सत्यतेबाबत स्वघोषणापत्राचा नमूना प्रपत्र- क प्रमाणे राहील.
३) वरिल दोन्ही स्वघोषणापत्रे साध्या कागदावर करता येतील. त्याकरिता न्यायिक कागदाची (हिरव्या रंगाचा कागद) आवश्यकता राहणार नाही.
४) स्वघोषणा प्रमाणपत्रावर नागरिकाने चुकीची / खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत संबंधित नागरिकावर भारतीय दंड विधान मधील संबंधित तरतुदी तसेच इतर अधिनियमातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. स्वघोषणा प्रमाणपत्रावर संबंधित नागरिकाचे सुस्पष्ट तसेच अलिकडच्या काळातील छायाचित्र (फोटो) व आधार क्रमांक नमूद असावे.
५) महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या १३ प्रकारच्या दाखले अथवा सोयीसुविधांसह सर्वच दाखले अथवा सोयी सुविधांसाठी स्वघोषणापत्र तसेच स्वयंसाक्षांकित प्रतींचा स्वीकार करण्यात यावा. महाराष्ट्र लोकसेवा हमी अधिनियमांतर्गत देण्यात येणाऱ्या दाखल्यां
व्यतिरिक्त अन्य दाखले अथवा सोयी सुविधांसाठी अर्जाचा नमुना प्रपत्र ड प्रमाणे राहील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९२०१२३४३३९१२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे