Take a fresh look at your lifestyle.

सन्मानपत्राने सन्मानित झाले शासकीय अधिकारी कर्मचारी

0

मुंबई- मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करून भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले.

मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषा विभागातर्फे दि. 14 ते 28 जानेवारी या दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त राज्यभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले होते. आजचा कार्यक्रम मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र, राज्यमंत्री महोदय प्रकृती अस्वस्थतेमुळे येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमासाठी त्यांनी शुभेच्छा पाठविल्या आणि सर्व सन्मानार्थींचे अभिनंदन केले आहे. शासकीय कर्मचारी आणि अधिकारी आपले कामकाज सांभाळून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देतात त्यांचे कौतुक केले पाहिजे, अशी सूचना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केली होती त्यानुसार मागच्या वर्षीपासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

सन्मानपत्राने सन्मानित झाले शासकीय अधिकारी कर्मचारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी हे आपल्या कामकाजाच्या माध्यमातूनही मराठी भाषेच्या संवर्धनात मोठ्या प्रमाणात हातभार लावत असतात. त्यांच्या या कामाची दखल शासनाने घेतली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रभारी संचालक श्री. दयानंद कांबळे यांनी मराठीतील बातमीला नवमाध्यमांची जोड देऊन पत्रकारितेला नवीन आयाम दिला आहे. त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या माध्यमातून जगभरातील मराठी भाषिकांना एकत्रित जोडण्याचे काम केले आहे. उपसंचालक श्रीमती सीमा रनाळकर या प्रदर्शन शाखेच्या प्रमुख आहेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध माध्यमांसाठी त्यांनी संकल्पना चित्रे तयार केले. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मराठी भाषेतून विपूल लिखाण केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील या तीन अधिकाऱ्यांसह मंत्रालयातील इतर कर्मचारी आणि अधिकारी यांचे सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन कौतुक करण्यात आले.

यात रोहन शंकर जळणकर, लिपिक, गृह विभाग, सारीका चौधरी, लिपिक, विधि व न्याय विभाग, कालिदास बांदकर, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, डॉ. स्नेहा चुरी, कक्ष अधिकारी, नियोजन विभाग, वैभव पाटील, कक्ष अधिकारी, अभियान संचालक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, अतुल कुलकर्णी, कक्ष अधिकारी, वित्त विभाग, श्रीमती लिना संखे, अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, प्रविण पंडित, लिपिक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांचा समावेश आहे.