Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, कार्यकर्ता व सेवक पुरस्कारासाठी २५ सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ. एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार देण्यात येतो. यासाठी 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२३-२४ या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह २६ ऑगस्ट २०२४ ते २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावे.

राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येते. तसेच राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार तसेच राज्यातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये २५ हजार सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ भेट आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे.