मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता; शासन निर्णय जारी
शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे व शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने वाचा येथील क्रमांक १ येथील दिनांक २७.२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना” राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाचा येथील क्रमांक (२) ते (५) येथील शासन शुध्दीपत्रकान्वये योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
१. विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजना” राबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा क्र. १ येथील दि. २७/१२/२०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र. (२) ते (५) येथील शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत.
२. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात.

यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतुक करण्याकरीता, बारमाही वापराकरीता शेत/ पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पाणंद रस्ते तयार करण्याकरिता “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.