एक राज्य एक गणवेश योजना सुरु….
१. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या नियमित तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेशाची रचना खालीलप्रमाणे राहिल.
२. मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित व स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णय दि. ८ जून, २०२३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश धारण करणे आवश्यक राहील. तसेच, स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी सदर गणवेश परिधान करावा. स्काऊट व गाईड विषयाचा गणवेश असलेल्या दिवशी (मंगळवार, गुरुवार, शनिवार) स्काऊट व गाईड विषयाच्या तासिका ठेवण्यात याव्यात.

३. मोफत गणवेश योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील शाळा दि. १५ जून २०२४ पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी संख्या लक्षात घेता दुसऱ्या (स्काऊट-गाईड) गणवेशाचे कापड शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात यावे. सदर स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी रु. १०० प्रति गणवेश व अनुषांगिक खर्च रु.१० असे एका गणवेशासाठी एकूण रु. ११० प्रति विद्यार्थी इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वर्ग करावी. सदर निधीतून विद्यार्थ्यांना दुसरा (स्काऊट-गाईड) गणवेश स्थानिक स्तरावर शिलाई करुन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत उपलब्ध करुन द्यावा.
प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०६१०१५१३११८५२१ असा आहे.