Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृती योजना…

0

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकीत विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागते. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना “परदेश शिष्यवृत्ती योजना” लागू करण्यात येईल व त्यासाठी रूपये १२० कोटीचा निधी उपलब्ध केला जाईल. अशी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली. व त्यास अनुसरुन अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना “परदेश शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय 

क्यूएस वर्ल्ड रॅन्कींग (Qs World Ranking) मधील २००च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पी.एच्.डी अभ्यासक्रमासाठी बीनशर्त प्रवेशास पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समूदायातील २७ विद्यार्थांना प्रतीवर्षी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून तिचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

१) विद्यार्थ्यांची पात्रता :-

(१) विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

(२) विदयार्थ्यांने परदेशातील क्युएस् अद्ययावत वर्ल्ड रॅकींगमध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेत खात्रीशीर व बिनशर्त प्रवेश मिळविलेला असावा.

(३) ज्या विद्यार्थ्यांने परदेशी शैक्षणिक संस्थाकडून अनकंडिशनल ऑफर लेटर मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी कंडिशनल ऑफर लेटर गृहीत धरेल जाणार नाही.

(४)विद्यार्थ्यांने या योजनेखालील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना, त्याने यापूर्वी महाराष्ट्र शासनाची वा कोणत्याही अन्य विद्यापीठाची वा इतर कोणत्याही राज्य शासनाची वा केंद्र शासनाची वा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.

(५) परदेशातील विद्यापीठ / शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षांचा असावा.

(६) एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेशीत विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

(२) शैक्षणिक अर्हता :-

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.

(३) वयोमर्यादा:-

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

(४) उत्पन्न मर्यादा:-

विद्यार्थ्यांच्या पालकांचे/ कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याच्या स्वत:च्या उत्पन्नासह सर्व स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी अविवाहीत असल्यास कुटुंबामध्ये त्याच्या पालकांचा समावेश असेल. विद्यार्थी विवाहीत असल्यास कुटुंबामध्ये पती/पत्नीचा समावेश असेल.

(५) एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक:-

एका कुटुंबातील एका मुलास फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.