22 खात्यांकडून रिक्त पदे जाहीर; ‘या’ महिन्यात निघणार जाहिरात
पाटो-पणजी येथील स्पेसीस इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राज्य कर्मचारी भरती आयोगाने वेगाने काम सुरू केले आहे. त्यांनी मागवलेल्या माहितीला 22 खात्यांंनी प्रतिसाद देत कर्मचारी भरतीसाठी विनंती केली आहे. त्याला अनुसरून हा आयोग येत्या नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी भरतीची पहिली जाहिरात जारी करणार आहे.
लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीआधी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती करणार आहे. यासाठी 22 खात्यांनी आपल्याला किती कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, याची माहिती राज्य कर्मचारी भरती आयोगाला कळवली आहे. पुढील, नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य कर्मचारी भरती आयोग या भरतीसाठी जाहिरात जारी करणार आहे. जाहिरातीनंतर उमेदवारांना या आयोगाच्या संकेतस्थळावरच अर्ज करावा लागेल. आयोगच उमेदवाराला परीक्षेसाठी ओळखपत्र देणार आहे.
लेखी परीक्षा व तोंडी मुलाखत याद्वारे आयोगच उमेदवाराची निवड करणार आहे. यापूर्वी खाती आपापल्या पातळीवर कर्मचारी भरती करत असत.
नियम अधिसूचित :– कर्मचारी भरती आयोगाविषयी विधेयक संमत झाल्यानंतर आता भरतीविषयक नियम अधिसूचित करण्यात आले आहेत. यामुळे एक नोव्हेंबरपासून होणारी कर्मचारी भरती ही आयोगामार्फतच होणार आहे. राज्य सरकारने संबंधित खात्यांना सध्या सुरू असलेली खात्याच्या पातळीवरील कर्मचारी भरतीची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी, असे कळवले आहे.
अशी होईल भरती :– पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, लघुलेखक श्रेणी 2 आदी पदे आयोगाकडून भरली जाणार आहेत. यापूर्वी प्रत्येक खात्याकडे जाऊन उमेदवाराला अर्ज सादर करावे लागत असत. मात्र, यापुढे एकत्रितपणे भरती होणार आहे. गोवा मुक्तीनंतर राज्य सरकार या पद्धतीने कर्मचारी भरती प्रथमच करत आहे.