जिल्हा परिषद २०२३ परीक्षेचे असे आहे सुधारित वेळापत्रक
जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पदांच्या परीक्षेसाठी आधी जाहीर केलेले वेळापत्रक चार दिवसांनी पुढे ढकलले आहे. आता 7 ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यातील परीक्षा होणार आहेत. आधी ही परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये लेखी परीक्षेची तयारी न झाल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाला परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

नगर जिल्हा परिषदेच्या क वर्ग प्रवर्गातील 935 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या 8 संवर्गासाठी 3 ते 11 ऑक्टोबरदरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रतिक्षा उमेदवारांना असतानाच शुक्रवारी (दि.29) प्रशासनाने आधीचे वेळापत्रक रद्द करून आता 7 ते 11 ऑक्टोम्बर या कालावधीतील सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारही बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, परीक्षा पुढे का ढकली याबाबत कानोसा घेतल्यानंतर नगर सोडून राज्यातील अन्य जिल्ह्यात परीक्षेची तयारी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर राज्य पातळीवरून सर्व जिल्ह्यातील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, आधीच शासकीय विविध पदांच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक विघ्न येत असताना जिल्हा परिषदेची परीक्षाही सुखरूप पार पडेल की नाही याबाबत उमेदवारांकडून शंका उपस्थित होत आहेत.