रेशन आपल्या दारी योजनेतंर्गत “शिधारथ” मार्फत होणार अन्नधान्य वितरण
१. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा अंतर्गत कलम १२ (१) मध्ये केंद्र व राज्य शासनांनी या अधिनियमात त्यांच्यासाठी उद्देशित असलेल्या भूमिकेशी अनुरूप लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये अधिकाधिक आवश्यक सुधारणा हाती घेण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

२. शिधावाटप दुकाने ही सार्वजनिक वितरण व्यवस्था व लाभार्थी यांना जोडणारा दुवा असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा चेहरा आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात जागेच्या अभावी, शिधावाटप दुकानाच्या जागेचे परवडत नसणारे भाडे, शिधावाटप दुकान चालविण्यासाठी कमी प्रमाणात मिळणारा प्रतिसाद या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे फिरते शिधावाटप दुकान “शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण करण्याकरिता रेशन आपल्या दारी ही योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय
१. राज्य शासनाच्या शासन आपल्या दारी या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर “रेशन आपल्या दारी” ही योजना सुरु करण्यास तसेच सदर योजनेंतर्गत मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना फिरते शिधावाटप दुकान “शिधारथ” मार्फत धान्य वितरण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.