Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक भरतीबाबत ‘हा’ शासन निर्णय जारी…

0

राज्यात सगळीकडे शाळा सुरु झाल्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पण सध्या जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत. यामुळे राज्य सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कंत्राटी भरतीसाठी तसा शिक्षण विभागाकडून जीआर काढण्यात आला आहे.

नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत असल्याचे राज्य शासनाच्या निदर्शनास आले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत.

राज्य सरकारकडून 07 जुलै 2023 रोजी काढण्यात आलेल्या या ‘जीआर’नंतर परिपत्रकदेखील जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये पुढील 15 दिवसांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यात यावी, असं सांगितलं आहे.

महत्वाचं म्हणजे या शिक्षकांना 20 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्ष ठेवण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.